जिल्हाधिकार्याच्या आदेशाला केराची टोपली
नगर – कोरोनाचा दुसरा बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू असतांना नगर तालुक्यातील जेऊर (बा) येथील आठवडे बाजार मात्र भरविण्यात आला होता. त्यामुळे एक प्रकारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली आहे.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रनेणे वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. त्याचे उल्लंघन करणार्यावर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले असतांना नगर तालुक्यातील जेऊर येथे आठवडे बाजार भरविण्यात आला होता.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीला आदेश देऊन ही ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.