आमदार राजळे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
शेवगाव – खासदार सुजय विखे पाटील व मी मतदारसंघातील विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर भरून काढला आहे. तसेच जास्तीचा निधी आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत. ताजनापूर योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. उर्वरित कामासाठी मागणी शासनाकडे केलेली आहे. परंतु कामे मंजूर झाली, कामांची निविदा निघाली की श्रेय लाटण्याच्या उद्देशाने निवेदन देणे – आंदोलन करणे असे प्रकार तालुक्यात होत असल्याचा टोला आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना लगावला.
अर्थसंकल्पीय तरतूद २० २३ अंतर्गत मंजूर असलेल्या ५० दत्त पाटी ते देवटाकळी या एक कोटीच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या . या रस्त्याबरोबरच त्यांनी वाघोली- कामत शिंगवे रस्ता, देवटाकळी रस्ता, शहरटाकळी अंतर्गत कदम वस्ती ते डोळे वस्ती रस्ता अशा ३ कोटी २५ लाख रुपये कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रल्हाद पाठक, महिला आघाडी तालुकाध्यक्ष आशाताई गरड, नगरसेवक सागर फडके, श्रीराम खरड, शंकराव चिकणे, सरपंच संभाजी कातकडे, बाळासाहेब विखे, सुभाष वाघमारे, सुभाषराव बदधे, महादेव पवार, डॉ शाम काळे, रणजीत वने उपस्थित होते.
यावेळी ढोरसडे आंत्रे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रोहिदास खबरे, गोकुळ निकम, बाळासाहेब गाढे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संदीप खरड, सूत्रसंचालन नारायण काळे यांनी केले तर मुसाभाई शेख यांनी आभार मानले.