नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा सोमवारी अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. ते अयोध्येला नंतर सहकुटूंब दर्शनासाठी जाणार आहेत. स्वत: नड्डा यांनीच संबंधित माहिती शनिवारी सोशल मीडियावरून दिली. मला सोहळ्याचे निमंत्रण मिळाले. त्याबद्दल मी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे आभार मानतो.
५०० वर्षांच्या संघर्षानंतर आपल्याला भव्य राम मंदिराची उभारणी होत असल्याचे पाहण्याचे भाग्य लाभले आहे. मी दिल्लीतील मंदिराच्या प्रांगणातून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार बनणार आहे, असे त्यांनी नमूद केले. देशभरातील मंदिरांमधून टीव्ही/एलईडी स्क्रीन प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला जाणार आहे. त्यावेळी मंदिरांमध्ये भाजपचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
यांची देखील असणार उपस्थिती
सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, प्रभास, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर या दाक्षिणात्य सुपरस्टार्सप्रमाणेच बॉलीवूडमधील अक्षयकुमार, अनुपम खेर, अजय देवगण, माधुरी दीक्षित, कंगणा राणावत आदी आघाडीच्या कलाकारांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तशा चित्रपट ताऱ्यांमध्ये भाजपचे खासदार असणाऱ्या हेमा मालिनी आणि सनी देओल यांचाही समावेश आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा या आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबरच विश्वनाथन आनंद, पी.टी.उषा, बायचुंग भुतिया हे क्रीडा क्षेत्रातील दिग्गजही निमंत्रित आहेत.
विशेष निमंत्रण असणाऱ्या उद्योगपतींमध्ये रतन टाटा, आनंद महिंद्रा, एन.आर.नारायण मुर्ती, अझिम प्रेमजी आणि इतरांचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हेही विशेष निमंत्रित आहेत. इतर नामवंतांमध्ये इस्त्रोचे प्रमुख एस.सोमनाथ, दिल्ली मेट्रोचे प्रधान सल्लागार ई.श्रीधरन, वरिष्ठ वकील हरीष साळवे आदींचा समावेश आहे.
विशेष यादीत आडवाणी आणि जोशीही
विशेष निमंत्रितांच्या विशेष यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांचाही समावेश आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती हेही विशेष निमंत्रित आहेत.