न्यूयॉर्क: अमेरिकेतील हडसन नदीजवळ 35 वर्षीय भारतीय महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या महिलेचे पतीही जवळच नदीमध्ये मृतावस्थेमध्ये आढळले आहेत. गरिमा कोठारी असे 35 वर्षे वयाच्या मृत महिलेचे नाव आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी त्या त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पडलेल्या आढळून आल्या. तर त्यांच्या पतीने आत्महत्या केल्याचे दिसत आहे, असे जर्सी शहराच्या पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदनानंतर कोठारी यांचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. मृत्युसमयी कोठारी या 5 महिन्यांच्या गर्भवती होत्या, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर कोठारी यांचे पती मन मोहन मॉल हे हडसन नदीमध्ये मृतावस्थेमध्ये आढळले. मॉलच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
गरिमा कोठारी या नावाजलेल्या शेफ होत्या. तर त्यांचे पती मन मोहन मॉल हे “आयआयटी’चे माजी विद्यार्थी होते आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील उच्च शिक्षणासाठी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत आले होते. या दोघांच्या मालकीचे “नुक्कड’ नावाचे भारतीय खाद्यपदार्थांचे हॉटेल न्यूजर्सीमध्ये प्रसिद्ध आहे. या दाम्पत्याचा अचानक झालेला मृत्यू म्हणजे हत्या आणि आत्महत्येचे प्रकरण असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, प्रादेशिक वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांचा अहवाल मिळणे बाकी असल्यामुळे अंतिम निष्कर्ष काढला गेलेला नाही. या दोघांबाबतची अधिक माहिती गोळा केली जात आहे.