जम्मू :– जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रशंसा केली. देशात ऐक्य घडवण्यासाठी, धर्मनिरपेक्षता आणि बंधूभाव मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात आली. त्या यात्रेसाठी राहुल यांना सॅल्युट, असे मेहबुबा जम्मूत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. मागील सात ते आठ वर्षांत देशातील धर्मनिरपेक्षता आणि बंधुभावाचा पाया डळमळू लागला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. राहुल यांच्या नेतृत्वाखालील यात्रेचा प्रारंभ कन्याकुमारीमधून झाला. आतापर्यंत कॉंग्रेसच्या त्या यात्रेत इतर काही विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले.
यात्रेची समाप्ती काश्मीरमध्ये होणार आहे. तिथे दाखल झाल्यावर यात्रेत मेहबुबा सहभागी होण्याची शक्यता बळावली आहे. त्यांनी राहुल यांची प्रशंसा करून त्याविषयीचे जणू संकेतच दिले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्याआधी यात्रेच्या माध्यमातून एकत्र येऊन विरोधी पक्ष भाजपला राजकीय संदेश देऊ शकतात.