बीजिंग – चीनमध्ये काही आठवड्यांपूर्वी वादग्रस्त “झिरो कोविड’ धोरणाविरोधात देशभर आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून हे धोरण अंशतः शिथील करण्यात आले. आता आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्यांसाठी सक्तीचे विलीनीकरण 8 जानेवारीपासून रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय करोनाच्या साथीमुळे बंद करण्यात आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमा देखील खुल्या करण्यात येणार आहेत. जवळपास 3 वर्षांनंतर चीनकडून आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या केल्या जाणार आहेत.
चीनमधील कोविड व्यवस्थापन “अ’ श्रेणीतून आता पुढील महिन्यापासून “ब’ श्रेणीमध्ये आणले जात आहे, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी जाहीर केले. या श्रेणीमध्ये डेंग्यूच्या तापासारख्या कमी गंभीर रोगांचा समावेश असतो. त्यामुळे 8 जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या केल्या जाणार आहेत, असे आयोगाच्या सूचनेमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांना दोन आठवडे अनिवार्यपणे सरकारी उपचार केंद्रांमध्ये विलगीकरणामध्ये रहावे लागत असायचे. विलगीकरणाचा कहा कालावधी हळूहळू 5 दिवसांपर्यंत आणि नंतर 3 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला होता.
Balochistan Terror Incidents : बलुचिस्तानातल्या दहशतवादी हल्ल्यात 6 पोलीस ठार तर 17 जण जखमी
चीनमध्ये “झिरो कोविड’ धोरण शिथील केले गेल्यानंतर अचानक करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच हे निर्बंध देखील कमी केले जात आहेत. चीनमध्ये सापडू लागलेला ओमायक्रॉन हा डेल्टा उत्परिवर्तित विषाणूपेक्षा कमी प्राणघातक असल्याचे मानले जाते आहे. याशिवाय करोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी जाहीर करणे देखील प्रशासनाने थांबवले आहे.