बारामती – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कार्यक्रमाअंतर्गत “माझा व्यवसाय माझा हक्क’ या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या उपक्रमाचा प्रारंभ बारामतीत रविवारी (ता. 31) होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या बाबत माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार व अतुल बेनके हे उपस्थित राहणार आहेत. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बारामती शहर व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरुन घेतले जाणार आहेत. फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार असून विविध उपयोगी कामांसाठी वाहने उपलब्ध करुन देण्याची नावनोंदणी होणार आहे.
यावेळी बारामती, शिरुर व जुन्नर करीता एकूण चार मोबाइल क्लिनिक (फिरता दवाखाना) दिले जाणार असून त्याचा प्रदान समारंभ होईल. या फिरत्या दवाखान्यांच्या (क्लाऊड बेस्ड हेल्थ किऑस्क) माध्यमातून बारामतीकरांच्या रक्तदाब, मधुमेह, कान, डोळे तपासणी, ईसीजी सारख्या विविध 50 तपासण्या विनामूल्य होणार आहेत. आशा सेविकांना मास्कवाटप, कोविड योध्दयांचा गौरव व विद्या प्रतिष्ठानला कोविड यंत्रसामग्री प्रदान करण्याचाही कार्यक्रम होणार आहे.