मस्ट वॉच… क्रिमिनल जस्टीस (प्रभात ब्लॉग)

गेल्या वर्षी साधारण याच सुमारास नेटफ्लिक्स वरील सेक्रेड गेम्स या वेब-सिरीजची सगळीकडे चर्चा होती. ज्या कोणाला सेक्रेड गेम्स विषयी माहिती मिळत होती, ती प्रत्येक व्यक्ती एकाच वेळी सेक्रेड गेम्सचे सगळे एपिसोड्स पाहिल्याशिवाय एका ठिकाणाहून उठतच नव्हती. प्रत्येक एपिसोड गणिक वाढत जाणारी उत्कंठा हाच त्या वेबसिरीजचा मेन ‘यूएसपी’ होता. आणि हेच नेमकं आजच्या तरुणाईला हवं होतं, त्यामुळे ‘युथ’मध्ये ही सिरीज आजही ट्रेंड होतेय. पण त्याच तोडीची आणखीन एक वेबसिरीज सध्या खूप जबरदस्त वेगाने ट्रेंड होतेय…क्रिमिनल जस्टीस.

एक मध्यम वर्गातील कुटुबांमधील तरुण फुटबॉल खेळाडू आदित्य शर्मा, याच्यावर ही संपूर्ण वेबसिरीज बेतलेली आहे. फुटबॉल मॅच जिंकल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीला संध्याकाळी जायचं आदित्यने पक्कं केलेलं असतं. तेवढ्यात त्याच्या बहिणीकडून त्याला तो ‘मामा’ बनणार असल्याची खुशखबर मिळते. ही गोष्ट ऐकल्यावर आदित्य खूप खुश होतो. संध्याकाळी पार्टीला जाण्याआधी वडील चालवत असलेली खासगी टॅक्सी सर्व्हिस मधील गाडी ‘आज तू थोडा वेळ चालव’ अशी त्याची बहीण त्याला विंनंती करते. २-३ राईड ना सर्व्हिस देऊन आपण पार्टीला निघून जाऊ असं आदित्यच्या डोक्यात असतं. टॅक्सीचं ऑनलाईन बुकिंग बंद करणार इतक्यात एक तरुणी त्याच्या गाडीत येऊन बसते. आदित्य तिला विनंती करतो कि माझं पर्सनल काम असल्यामुळे तुम्ही दुसरी गाडी बुक करा… पण ती तरुणी तिच्याच तोऱ्यात असते. हताश होऊन आदित्य त्या मुलीला ज्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी घेऊन जातो, मात्र डेस्टिनेशन जवळ आल्यावर ती मुलगी सारखं-सारखं ते बदलत असते. यामुळे आदित्यला पार्टीला तर जात येतच नाही, पण या मुलीच्या अशा वागण्यामुळे तो स्वतः वैतागून जातो. शेवटी आदित्य त्या मुलीला तिच्या घराजवळ सोडतो. तिला सोडून थोडं पुढे गेल्यावर गाडीमध्ये त्या मुलीचा मोबाईल राहिल्याचं त्याच्या लक्षात येतं, तो मोबाईल परत द्यायला तो तिच्या घरी जातो. आता ती मुलगी चक्क आदित्यला सॉरी म्हणते आणि तिच्या मुळे त्याला पार्टीला जात आलं नाही, त्यामुळे आपण इथे माझ्या घरीच पार्टी करू असं त्याला सांगून तिच्या घरी थांबण्याची विनंती करते. त्यानंतर ते दोघेही पार्टीमध्ये गुंग होऊन जातात. त्या मुलीला अंमली पदार्थांचं व्यसन असतं, ती आदित्यला सुद्धा अंमली पदार्थ देते, थोड्या वेळाने आदित्यला गुंगीमुळे झोप येते. रात्री उशिरा जेव्हा आदित्यला जाग येते, तेव्हा त्याला समजतं कि त्या मुलीचा कुणीतरी खून केलेला आहे. एखाद्या सामान्य माणसाकडून अशा प्रसंगी ज्या चुका होऊ शकतात, त्या आदित्य कडून होतात. पोलीस त्याला खून, बलात्कार यासाठी अटक करतात. इथून पुढे आदित्यची लढाई सुरु होते, त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागते कि खरे गुन्हेगार सापडतात हे तुम्ही वेब-सिरीज मध्येच पाहिलेलं बरं.

पहिला एपिसोड तींगमांशू धुलिया या बॉलिवूड मधील दिग्गज दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलाय. तर पुढील सर्व एपिसोडचे दिग्दर्शन विशाल फुरीया या नवख्या दिग्दर्शकाने केलंय. या संपूर्ण वेब-सिरीजचा हिरो आहे तो म्हणजे लेखक… ज्या पद्धतीने लेखकाने कथा लिहिली आहे, प्रत्येक एपिसोड गणिक आपली उत्सुकता वाढत जाते, आदित्यला न्याय मिळणार का हे जाणून घेण्याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली असते. पीटर मोफाट यांच्या गाजलेल्या क्रिमिनल जस्टीस या सिरीजचं रूपांतर श्रीधर राघवन यांनी केलंय. अंदाधुन, बदलापूर, एक हसिना थी या चित्रपटांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचे ते लहान भाऊ आहेत. श्रीधर राघवन यांनी केलेलं मूळ कथेचं रूपांतर आपली उत्सुकता अगदी शेवटच्या भागापर्यंत ताणून ठेवतं. विक्रांत मॅसी या अभिनेत्याने ‘मिर्झापूर’ या वेब सिरीज नंतर आणखीन एक तगडा परफॉर्मन्स दिलाय. विक्रांतने स्वतःला एक अभिनेता म्हणून सिद्ध केलंय असं आपण ही सिरीज पाहिल्यानंतर म्हणू शकतो. जॅकी श्रॉफ आणि पंकज त्रिपाठी या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय हा या वेब सिरीजचा आणखीन एक ‘यूएसपी’
म्हणावा लागेल. पंकज त्रिपाठी यांनी जे माधव मिश्रा नावाचं पात्र साकारलं आहे, हे पात्र पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या एपिसोड पर्यंत खूप महत्वाची भूमिका निभावते.

एकुणातच सेक्रेड गेम्स चा दुसरा पार्ट येईपर्यंत एक तगडी वेबसिरीज पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर ‘क्रिमिनल जस्टीस’ हा एक परफेक्ट ऑप्शन नक्कीच असू शकतो. फक्त हॉटस्टार स्पेशल या सिरीज मध्ये या वेबसिरीजचा पहिला एपिसोड हॉटस्टार वर फ्री मध्ये पाहायला मिळतो, पण पुढचे एपिसोड्स पाहण्यासाठी मात्र आपल्याला सब्सस्क्रिप्शन घ्यावं लागतं त्यामुळे ह्या खर्चिक ऑप्शन बद्दल सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल.

– अमोल कचरे  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.