उन्हाळ्यात केसांची काळजी

केस लांबसडक असोत की शॉर्ट. त्यांची नियमित देखभाल आवश्‍यक आहे. आणि उन्हाळ्यात तर विशेषच, कारण उन्हाळ्यात उष्णतेने केस शुष्क होतात, कोरडे पडतात, टू व्हीलरवर प्रवास करणाऱ्या महिलांनी तर केसांची अधिक काळजी घेतली पाहिजे. उष्ण वारे, धूळ यामुळे केस खराब होतात. तेव्हा पुढील काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे.

– केसांना धूळ, ऊन आणि प्रदूषणापासून वाचवा. यासाठी टोपी, स्कार्फ किंवा हेल्मेट वापरा. रोज केस खुले सोडू नका.
– आठवड्यातून दोनदा तरी तेलाची मालीश करा. त्याने केसांना पोषण मिळेल. केस धुण्याआधी मोकळे सोडा.
– केसात गुंता झाल्यावर केस तुटण्याची भीती असते. त्याने केसांचा दाटपणा कमी होतो. ओले केस कधीही विंचरू नका. केस तुटू नयेत म्हणून खालील बाजूपासून विंचरायला सुरू करा.
– केस डाय करणे टाळा. रंग केसांचे पोषण नष्ट करून त्यांना ड्राय करतात. त्याने केसांचा दाटपणा कमी होतो आणि चमकही जाते. केस डाय करायचे असतीलच तर प्राकृतिक रंग वापरावे.
– केसांना चमकदार आणि दाट ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या. नारळ, सोया, राजगिरा, डाळी, संत्रं, व इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
– केसांची निगा राखण्यासाठी महागड्या केमिकलयुक्त प्रॉडक्‍ट्‌सऐवजी नैसर्गिक उपायांनी केसांच्या अनेक समस्यांवर मात करू शकता. त्यासाठी बटाटा ही एक साधी, सहज उपलब्ध होणारी आणि परिणामकारक गोष्ट आहे.

दाट आणि सॉफ्ट केसांसाठी
दोन ते तीन बटाटे घ्या, ते सोलून त्यांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि मध मिसळा. हा तयार केलेला पॅक केसांवर लावा. याला काही वेळ वाळू द्या. जेव्हा हा पॅक वाळल्यानंतर चांगल्या माइल्ड शॅंपूने केस धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल.

लांब केसांसाठी
दोन बटाटे घ्या आणि याचा रस काढा. त्यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. ते 30 ते 40 मिनिटांपर्यंत केसांमध्ये राहू द्या. यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. लगेचच शॅंपू लावायची गरज नसते.

कोंडा असलेल्या केसांसाठी
एक किंवा दोन बटाटे घेऊन त्यांचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि दही मिसळा. ही पेस्ट केसांना लावून थोड्या वेळेसाठी राहू द्या. नंतर एखाद्या चांगल्या शॅंपूने केस धुऊन घ्या.

केसगळतीसाठी उपयुक्त कांदा. कांदा हा आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ. कांद्याचा वापर केसांच्या – सौंदर्यवृद्धीसाठीही करता येतो. त्याबाबत थोडी माहिती-
– दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर ऑलिव्ह ऑईल मिसळा. आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण केसांच्या मुळांना आणि स्कॅल्पला लावा. यामुळे केस गळणं कमी होईल.आणि केसांची वेगाने वाढ होईल.
– दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण रात्री केसांना लावा आणि सकाळी धुवून टाका. केसांची वाढ होण्यास मदत होईल.
– दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर मध घाला. केसांना लावा. तासाभरान धुवून टाका. यामुळेही केस दाट आणि लांब होतील.
– दोन चमचे कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून केसांवर लावा. तासाभराने धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल आणि केस मऊ होतील.
– अर्धा कप कांद्याच्या रसात 7 ते 8 कढीपत्त्याची पानं वाटून घाला. चमचाभर दही घाला. या मिश्रणाने स्कॅल्पवर मसाज करा.
– दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर आंबट दही आणि लिंबाचा रस घाला. याने स्कॅल्पवर मसाज करा. अर्ध्या तासाने धुवा. केस बळकट होतील.
– दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर बदामाचं तेल घाला. ते रात्रभर केसांना लावून ठेवा. सकाळी धुवून टाका. केस मुलायम आणि चमकदार होतील.
– दोन चमचे कांद्याच्या रसात अंड्याचा पांढरा भाग मिसळा. याने स्कॅल्पवर मसाज करा. तासाभराने धुवून टाका. यामुळे केस वाढतील व केसगळती देखील कमी होईल.

– अनुराधा पवार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.