Muslim woman – मध्य प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) यांचा गृहजिल्हा असलेल्या सिहौर येथे भारतीय जनता पार्टीला मतदान केल्यामुळे एका मुस्लिम महिलेला तिच्या दीराने मारहाण केली. संबंधित महिलेने चौहान यांची भेट घेतल्यावर त्यांनी तिला अभय दिले असून मध्य प्रदेशात या विषयाची चांगलीच चर्चा होताना दिसते आहे.
समीना बी असे संबंधित महिलेचे नाव असून आपली तक्रार घेऊन ती थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली व त्यानंतर शिवराज यांनीही तीची भेट घेतली. महिलेच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्यावर ती आणि तिची मुले आनंद साजरा करत असताना तिचा दीर तेथे आला आणि त्याने तिला शिविगाळ सुरू केली.
तिने याला विरोध केल्यावर दीराच्या पत्नीने त्याला काठी आणून दिली व तिला मारहाण करण्यात आली. भाजपला मतदान का केले असे ते विचारत होते. भाजप सरकारच्या लाडली बेहना योजनेचा आपल्याला लाभ होतो आहे. त्याशिवाय सरकारच्या इतर योजनांचेही आपण लाभार्थी आहोत . त्यामुळेच आपण भाजपला मतदान केल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, पसमांदा मुस्लिम महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नौशाद खान यांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनीही तिची भेट घेतली. त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.