मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा पाकिस्तान कलाकार यांच्याविरोधात सूर आवळला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर हल्लाबोल केला आहे. अमेय खोपकर यांनी नुकतेच पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केले असून सध्या त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.
अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, ‘भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय.
भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच
फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम…— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 30, 2023
पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरिजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.’ असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला काही युझर्सनी लाइक केले आहे.
अमेय खोपकर हे अनेकवेळा ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर टीका करत असतात. मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. ‘बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’ असं ट्वीट अमेय खोपकर यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते.