पुसेसावळी – खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील सर्व हिंदू- मुस्लिम बांधव आजतागायत एकोप्याने राहत आहेत. या गावाला हिंदू- मुस्लिम ऐक्याची, धार्मिक, सामाजिक व अध्यात्मिक परंपरा आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहकार्य करण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून या गावात चालत आलेली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा, असे निवेदन मुस्लिम समाजाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी हिंदू देवदेवतांचा अवमान करण्याचा निंदनीय आक्षेपार्ह प्रकार घडला. ज्या समाजकंटकाने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीचा पुसेसावळी मुस्लिम समाज तसेच , पुसेसावळी जामा मस्जिद ट्रस्ट कधीही समर्थन करीत नाही आणि करणारही नाही. ज्या समाजकंटकाकडून हा घाणेरडा प्रकार घडलेला आहे, त्यास कठोर शासन झाले पाहिजे ही आमची भूमिका असून घडलेल्या निंदनीय प्रकाराचा सर्व मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येत असल्याबाबतचे निवेदन खटावचे तहसीलदार, वडूजचे पोलीस उपअधीक्षक व औंधच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी तसेच दोषी आढळल्यास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समाजाकडून करण्यात आली आहे. परंतु, एका युवकाच्या निषेधार्ह कृत्यामुळे संपूर्ण समाजाला हिंदू बांधवांनी वेठीस धरु नये, अशी विनंती प्रशासनास केली आहे.