राहुरी विद्यापीठ/राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे गावाजवळ एका वीस वर्षीय तरुणीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली आहे. या तरुणीच्या हातावर शीतल असे नाव गोंदलेले आहे. या तरुणीची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
ही घटना रविवारी रात्री 1 ते 2 च्या दरम्यान उघडकीस आली आहे.
राहुरी कारखाना येथील गुंजाळ नाक्याजवळील चिंचविहिरे शिवारातील एका शेतात 20 ते 22 वर्षीय तरुणीच्या मृतदेह आढळून आला आहे. विकास गिते यांच्याकडे कुकुटपालनाचे पक्षी नेण्यासाठी टेम्पो आला होता. टेम्पोला रस्ता दाखविण्यासाठी विकास गिते नगर-मनमाड महामार्गापर्यंत आले असता रस्त्याच्या कडेला पंजाबी ड्रेस घातलेल्या तरुणीचा पालथ्या अवस्थेत पडलेला मृतदेह त्यांनी पाहिला, त्यांनंतर गिते यांनी राहुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
राहुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाच्या हातावर शीतल तर अंगठ्याजवळ एसपी असे नाव गोंदलेले दिसले. तरुणीचे अंदाजे वय 20 ते 22 वर्ष असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. डोक्यात दगड घातल्याने चेहरा ओळखता येत नाही.
घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळावरुन श्वानाने नगर-मनमाड महामार्गापर्यंत माग काढला. अज्ञात आरोपी वाहनाने याठिकाणी आला असावा, तो नगरहून शिर्डीच्या दिशेने आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनास्थळी दारुची व पाण्याची बाटली आढळून आली.
यावरुन आरोपी व ती तरुणी हे दोघेही या जागी बराचवेळ या ठिकाणी बसले असण्याची शक्यता आहे. पथकाने ज्या दगडाने हत्या केली, त्या दगडावरील ठसे पोलिसांनी घेतले आहेत. रक्त सांडलेल्या ठिकाणची माती परीक्षणासाठी घेण्यात आली आहे.
घटनास्थळी अतिरीक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे आदींनी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे करित आहेत.