लंडन – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ऍस्ट्राझेनेकाच्या सहयोगातून ऑक्सफर्ड विद्यापिठाने विकसित केलेली लस सुरक्षित असून या लसीमुळेच रक्तात गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे ऍस्ट्राझेनेकाने म्हटले आहे. या लसीमुळे रक्तात गुठळ्या होत असल्याचे युरोपातील काही देशात म्हटले जाऊ लागले होते. त्या पार्श्वभुमीवर ऍस्ट्राझेनेका आणि ब्रिटनमधील औषध नियामकांनी म्हटले आहे. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये भारतातील सीरम इस्टिट्युटचेही सहकार्य आहे. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गुठळ्या होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभुमीवर लस वापरण्याला नेदरलॅन्डमध्ये स्थगिती देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आयर्लंड, बल्गेरिया, डेन्मार्क, नॉर्वे आणि आईसलॅंड या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाची लस वापरणे स्थगित केले आहे. युरोप अणि ब्रिटनमधील 17 दशलक्ष नागरिकांना ही लस दिली गेलेली आहे. तर रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण अत्यल्प आणि शंभराच्या आतमध्ये आहे. ही लक्षणे दिसणे सर्वसामान्यांमध्ये अगदी स्वाभाविक आहे, असे ऍन्स्ट्राझेनेकाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ऍन टेलर म्हणाले. लसीबाबत सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व आहे आणि लसीच्या सुरक्षिततेवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत लस देण्यात आलेल्या 17 दशलक्ष जणांमध्ये लसीमुळे रक्तात गुठळ्या झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे कंपनीने म्हटले आहे.