नागपूर – धारदार शस्त्राने सपासप वार करून युवकाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली. ही घटना शहरातील कपिल नगर भागातील म्हाडा कॉलनी परिसरात बुधवारी सायंकाळी घडली. कमलेश बंडू सहारे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तरुणीची छेड काढल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणीची छेड काढली होती. याप्रकरणी पोलिसांनी कमलेशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर तो काही दिवसापूर्वी जामिनावर बाहेर आला. बुधवारी तो आपल्या बहिणीकडे गेला असता तरुणीचा भाऊ व त्याच्या साथीदारांनी कमलेशला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात कमलेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. मागच्या काही दिवसात नागपूरमध्ये हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. हत्यांचे सत्र सुरू असल्याने नागपूरकरांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.