दारुच्या नशेत भावाकडून सख्ख्या भावाचा खून

कोरेगाव  -जुन्या भांडणाच्या रागातून दारूच्या नशेत दीपक गुलाब कांबळे (वय 49) याने त्याचा सख्खा भाऊ सुरेश (वय 42) याचा लोखंडी फुकणीने डोक्‍यात वार करुन खून केला. ही घटना तडवळे, ता. कोरेगाव येथे गुरुवारी (दि. 19) रात्री घडली. संशयित दीपक याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तडवळे येथे आंबेडकरनगरात गुलाब कांबळे हे कुटुंबासह राहतात. त्यांची मुले दीपक व सुरेश व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. त्यामुळे घरातील लोक वैतागले होते. दीपक हा कामासाठी गुरुवारी सकाळी लवकर बाहेर गेला. थोड्या वेळाने सुरेश कोरेगावला गेला.

दीपक सायंकाळी 5 वाजता घरी आल्यानंतर सुरेशचे नाव घेऊन शिवीगाळ करत होता. त्याचा आज खूनच करतो, अशी धमकी तो देत होता. नेहमीची भांडणे असल्याने कुटुंबीयांनी फारसे मनावर घेतले नाही. सुरेश हा घरी आलाच नाही. तो रात्री आंबेडकरनगरात एका सिमेंटच्या कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. दीपकने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात चुलीजवळची लोखंडी फुंकणी उचलली आणि आता सुरेशला जीवंत सोडत नाही, असे म्हणत तो घराबाहेर गेला. थोड्या वेळाने त्याने सिमेंटच्या कट्ट्यावर बसलेल्या सुरेशच्या डोक्‍यात व चेहऱ्यावर फुंकणीने वार करून खून केला.

तेथून रागाच्या भरात तो घराजवळ गेला आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. प्रसंगावधान राखून गुलाब कांबळे यांनी घरात जाऊन दाराला आतून कडी लावून घेतली. दीपकने रागाच्या भरात दारावर दगड फेकून मारला आणि फुंकणी टाकून निघून गेला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुरेशला कुटुंबातील लोक व नातेवाइकांनी खाजगी जीपमधून कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्‍टरांनी सुरेशला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर आयपीएस अधिकारी रितू खोखर, सपोनि संतोष साळुंखे, हवालदार केशव फरांदे, पोलीस नाईक अमोल सपकाळ हे तडवळे येथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दीपकला ताब्यात घेतले. त्याने सुरेशचा खून केल्याची कबुली दिली असून न्यायालयाने सोमवार, दि. 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.