fbpx

अरुण लाड यांच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे : रामराजे

फलटण -पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना वैचारिक वारसा आहे. क्रांती अग्रणी जी. डी. (बापू) लाड यांचे ते चिरंजीव आहेत. अरुण लाड यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत रहावे, असे आवाहन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ येथील अनंत मंगल कार्यालयात झालेल्या पदवीधर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक किरण लाड, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, नगराध्यक्ष सौ. नीता नेवसे, कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन सूर्यवंशी-बेडके, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार उपस्थित होते.

वैचारिक वारसा असलेला अरुण लाड यांच्यासारखा आमदार विधान परिषदेत हवा. यापूर्वी या निवडणुकीत एकाच पक्षाचे वर्चस्व होते. आता ती परिस्थिती राहिली नाही. फलटण तालुक्‍यात नऊ हजारावर पदवीधर मतदार आहे. संजीवराजे यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. या निवडणुकीत लाड यांना मतदान होण्यासाठी यंत्रणा राबवावी लागणार आहे. या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यावर माझे लक्ष राहणार आहे. आळस व बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, असा इशारा रामराजे यांनी दिला.

ना. पाटील म्हणाले, मागील निवडणुकीत सारंग पाटील यांनी चांगली लढत दिली होती. या निवडणुकीत अरुण लाड यांना प्रथम पसंतीचे मत देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. फलटण तालुक्‍यात 90 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान लाड यांना झाले पाहिजे.
आ. शिंदे म्हणाले, पहिल्या पसंतीचे मत तुमच्या उमेदवाराला देऊन, दुसरे मत आम्हाला द्या, असे सांगून दिशाभूल होण्याची शक्‍यता आहे. कोणीही दुसऱ्या पसंतीचे मत न देता, केवळ प्रथम पसंतीचे मत लाड यांना द्यावे. आ. चव्हाण, सुनील माने यांची भाषणे झाली. संजीवराजे यांनी प्रास्तविक केले. प्रत्येक गावातील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी यंत्रणा पक्षाच्या माध्यमातून उभी केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी स्वागत केले. प्रा. भीमदेव बुरुंगले यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.