पिंपरी -विरोधक टोळीच्या सदस्याला मारण्याबाबत कट रचण्यासाठी अल्पवयीन मित्र एकत्र जमले. दरम्यान दारू पिऊन नाचगाणे सुरू असताना एका मित्राने इतर मित्रांना सिगार दिली नाही, या कारणावरून मित्रांनी कोयत्याने वार करत निर्घृणपणे मित्राचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी जुना जकात नाका, मोशी येथे घडली.
सुमित सतीश बनसोडे (वय 15, रा. बनकरवस्ती, मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित याच्या एका मित्राची कबुतरांची ढाबळ आहे. त्या ढाबळीत डुडुळगाव येथील त्यांचा विरोधक असलेला एकजण येऊन गेल्याचा संशय सुमित आणि त्याच्या मित्रांना होता. ज्याच्यावर संशय होता त्याच्याकडे देखील कबुतरांची ढाबळ होती. विरोधकाला मारण्याचा सुमितच्या मित्रांनी कट रचला होता.
त्यासाठी सोमवारी अकराच्या सुमारास पाच ते सात मित्र एकत्र जमले. ते मोशी येथील जुन्या जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात गेले. तिथे त्यांनी विरोधक तरुणाला मेसेज करून चर्चा करण्यासाठी म्हणून बोलावून घेतले. तो जंगलात चर्चेसाठी आल्यानंतर त्याला मारण्याचा यांचा कट होता.
मित्राकडून लागला सुगावा
सुमितचा खून केल्यानंतर तिथे असणारा एक मित्र सोमवारी दिवसभर सुमितच्या आईसोबत त्याला शोधत फिरत होता. मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याने पोलिसांना सुमित जुना जकात नाक्याजवळ एका झाडाखाली झोपला असल्याचे सांगितले आणि पोलिसांना थेट घटनास्थळी नेले. या सर्व प्रकरणात पोलिसांचा त्या मित्रावरील संशय बळावला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी मिळून हा खून केल्याचे सांगितले.