नवी दिल्ली : भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याला अजमेर पोलिसांनी अटक केली आहे. प्रेषितांविरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपातून निलंबित झालेल्या नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण आपले घर देऊ असे चिश्ती याने जाहीर केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करत त्याला अटक केली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खादीम सलमान चिश्ती याला रात्री १२ वाजता ४५ मिनिटांनी अटक करण्यात आली. सलमान चिश्ती याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
उदपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांच्या हत्येआधी हल्लेखोरांनी व्हिडीओ शूट केला होता. त्या आणि सलमान चिश्तीच्या व्हिडीओमधील भाषेत साम्य आढळत आहे. या व्हिडीओत सलमान चिश्ती धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी जाहीरपणे नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची धमकी देत आहे.
व्हिडीओत सलमान चिश्ती, “माझ्या जन्मदात्या आईची शपथ घेऊन सांगतो की, मी तिला सर्वांसमोर गोळी घातली असती. मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की, मी तिला गोळी घातली असती आणि आजही सांगतो की, जो कोणी तिचा शिरच्छेद करुन मुंडकं आणेल त्याला मी माझं घर देईन” असे म्हणताना दिसत आहे.