महापालिका अधिकाऱ्यांना पोलिसांकडून अभय

दापोडी दुर्घटनेला दोन दिवस उलटून देखील चौकशी नाहीच

पिंपरी – दापोडीतील दुर्घटनेत दोन जणांचा जीव गमावला तरी पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही. केवळ महापालिकेचे संबंधित अधिकारी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. परंतु, दोन दिवस उलटून देखील जबाबदार अधिकाऱ्यांची नावे गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेली नसल्यामुळे पोलीस महापालिका अधिकाऱ्यांचा बचाव करत आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दापोडीत महापालिकेच्या वतीने ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू होते. काम करत असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात महापालिका अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.1) दापोडी येथे घडली. याप्रकरणी सब ठेकेदार, सुपरवायझर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सब ठेकेदार अशोक माणिकराव पिल्ले, सुनील रमेश शिंदे, सुपरवायझर धनंजय सुधारक सगट यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दोन दिवस झाले. तरी, देखील कोणतीही कारवाई झाली नाही.

या कामासाठी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता देखरेख ठेवत होते. पोलिसांनी केवळ महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोघांचा बळी गेला आहे. घटनेला दोन दिवस उलटले तरी पोलिसांनी महापालिकेकडे संबंधित अधिकाऱ्यांची साधी चौकशी केलेली नाही. कोणत्या अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी होती. याची माहिती घेण्यात आलेली नाही. अथवा कारवाई करण्यात न आल्यामुळे या अधिकाऱ्यांना वाचविण्याची धडपड सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी अधिकाऱ्यांकडून चाललेला खेळ थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

गुन्हा दाखल, चौकशी नाही
याबाबत बोलताना सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता, उपअभियंत्यावर होती. पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अद्यापपर्यंत महापालिकेकडे चौकशीसाठी आले नाहीत.

“त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार – निकम
दापोडीतील दुर्घटनेप्रकरणी अमृत योजनेच्या कामाचा सल्लागार आणि ठेकेदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे. सात दिवसांत लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. कंत्राटदार पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फ्राक्‍ट्रक्‍चर लिमिटेडचे एम.बी. पाटील आणि युनिटी कन्स्ट्रक्‍शन सल्लागार महेश पाठक यांना काळ्या यादीत ठाकण्यात येणार असल्याची माहिती सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान अंतर्गत (अमृत) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरातील 37 ठिकाणी जलनि:सारण व मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. 7 मार्च 2018 रोजी पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे मालक एम. बी. पाटील यांना कामाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन वर्षांत काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. परंतु आतापर्यंत केवळ 40 टक्केच काम पूर्ण झाले आहे.

दापोडीत याच ठेकेदाराचे काम सुरू होते. पावसामुळे ते काम अर्धवट राहिले होते, ते पूर्ण करण्यास त्यांनी मुदतवाढ घेतली होती. त्यासाठी त्यांनी सहा मीटर खोल खड्डा खोदला होता. संबंधित सल्लागाराने त्या दुर्घटना झालेल्या स्थळाची पाहणी केली नव्हती. त्यामुळे सल्लागार युनिटी कन्स्ट्रक्‍शनचे महेश पाठक यांनाही महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांना सात दिवसात खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत. 40 टक्केच काम पूर्ण झाल्याने महापालिकेने पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फास्ट्रक्‍चर या कंत्राटदाराला प्रति दिन एक लाख रुपये दंड आकारण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 10 लाख रुपये दंड वसूल केला आहे, असे निकम यांनी सांगितले.

कासारवाडी सीमा भिंत प्रकरणी ठेकेदार दोषी
तीन महिन्यांपूर्वी कासारवाडीत सीमा भिंत कोसळली होती. त्यामध्ये लोकेश ठाकूर या बालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेत ठेकेदाराची चूक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ठेकेदार दोषी आढळल्याचा अहवाला चौकशी समितीने दिला आहे. त्यांच्याकडून पीडित कुटुंबाला आर्थिक भरपाई देऊ केली होती, असेही निकम यांनी सांगितले. या ठेकेदारावर कोणती कारवाई केली हे मात्र निकम यांनी स्पष्ट केले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.