बांधकाम मजुरांच्या मागण्यांसाठी महापालिका प्रशासनाला साकडे

पिंपरी – बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतीतर्फे नुकतेच महापालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाला साकडे घालण्यात आले. तसेच, याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्‍त, कामगार आयुक्‍त कार्यालय (पुणे) यांनाही देण्यात आले. अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये प्रिया रोडे, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे यांच्यासह बांधकाम मजूर सहभागी झाले होते.

सहायक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेत नोंदणी आणि नूतनीकरणाचे कोणतेच काम केले जात नाही. त्यामुळे बांधकाम मजूर शासनाच्या योजनेपासून वंचित राहत आहेत. नोंदणी नसल्यामुळे त्यांना कोणतेही लाभ दिले जात नाही.

ज्या कामगारांची नोंदणी झालेली आहे त्यांना नूतनीकरणासाठी विविध कागदपत्रे मागून अडवणूक केली जाते. तरी, संबंधित बांधकाम मजुरांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नोंदणी व नूतनीकरण करावे. म्हाडा आणि इतर गृहप्रकल्पांच्या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये काही बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित विकसक आणि म्हाडा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी. शहरासाठी स्वतंत्र बांधकाम कल्याण मंडळाचे कार्यालय सुरू करावे. बांधकाम मजुरांची नोंदणी, लाभ ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावे. बांधकाम कामगारांच्या नाक्‍यावर निवारा शेड, पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा द्याव्या. नोंदणी नसलेल्या बांधकाम मजुरांचा बांधकाम सुरू असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना अपघाती मृत्यूप्रमाणे लाभ देण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)