सातारा – गेंडामाळ नाक्याजवळील हुतात्मा उद्यानातील सिंथेटिक ट्रॅकची दुरवस्था झाली असून पालिकेने या ट्रॅकची दुरुस्ती करावी, अशी मागणी व्यायामप्रेमी करीत आहेत. तसेच या उद्यानातील झाडांची वाढ चांगली झाली असतानाही उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणी घातल्याने काही झाडे सुकून गेली आहेत.
गेल्या काही दिवसांतील पावसामुळे झाडांना जीवदान मिळण्याची शक्यता असली तरीही या झाडांची देखभाल करण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. फाशीचा वड हुतात्म्यांच्या स्मरणासाठी हे उद्यान विकसित करण्यात आले असून या उद्यानात सकाळी व सायंकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या उद्यानात चालण्यासाठी दोन ट्रॅक बनविण्यात आले आहेत. त्यापैकी सिंथेटिक ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. उद्यानास विस्तीर्ण जागा लाभली असून मोठ्या प्रमाणात झाडेही लावली आहेत. मात्र, त्याचे संगोपन करणे गरजेचे बनले आहे.