डायग्नोस्टिक सेंटरवर पालिकेची कारवाई

कर्मचाऱ्यांत ‘सोशल डिस्टन्स’ नाही

पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेल जवळील पीएच डायग्नोस्टिक सेंटरवर महापालिकेच्या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या ठिकाणी 25 कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याकडून या नियमाचे पालन न केल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

शहरात करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून अत्यावश्‍यक सेवा तसेच शासनाच्या आदेशानुसार, परवानगी देण्यात आलेल्या आस्थापनांच्या ठिकाणी नियमांचे पालन होते किंवा नाही याची तपासणी केली जात आहे.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्या सूचनेनुसार, क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरिक्षक अमोल लांडगे, दिनेश सोनवणे, अब्दुल करीम मुजावर, नितीन राजगुरू, प्रमोद ढसाळ, शांताराम सोनावणे, एकनाथ माने, धनाजी नवले तसेच प्रियंका काक यांनी या डायग्नोस्टिक सेंटरच्या ठिकाणी तपासणी केली असता; कर्मचाऱ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्याचे तसेच मास्कही वापरण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या सेंटरवर कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.