विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतरही उपनगरांत बंदच
हडपसर – शहराबरोबरच उपनगरांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हडपसर परिसरातही रुग्णांची संख्या मोठी आहे. हडपसर हा हॉटस्पॉट ठरत आहे. यामुळे परिसरातील अनेक खासगी डॉक्टरांकडून दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. अशावेळी अन्य आजार असलेल्या रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्य समस्या वाढीस लागल्या आहेत. अशीच स्थिती सर्वत्र असल्याने संबंधित डॉक्टरांनी दवाखाने सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.
तसेच, दवाखान्यांचा परवाना रद्दचाही इशारा देण्यात आला आहे. असे असताना अद्यापही अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडलेले नाहीत. त्यामुळे अशांवर कारवाई, हाच एक पर्याय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणे शहरातील शासकीय रुग्णालयात करोनावर उपचार होत असल्याने त्या ठिकाणी अन्य आजारांवर उपचार घेणे अवघड आहे. यामुळे खासगी दवाखान्यांवरच रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरू होणे आवश्यक असताना दवाखाने बंद असल्याने अशा दवाखान्यांची माहिती घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी महापालिका प्रशासनास केली आहे तसेच संबंधित डॉक्टरविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.