- आठ बांधकामे केली जमीनदोस्त
पिंपरी – “ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत जुनी सांगवी (प्रभाग क्रमांक 32) येथे गुरुवारी (दि. 11) महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईमध्ये 8 आरसीसी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
अंदाजे 21 हजार 700 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर ही कारवाई झाली.
जुनी सांगवी येथे बुधवारी (दि. 10) 7 आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये 11 हजार 300 चौरस फुट इतके बांधकाम जमीनदोस्त केले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई झाली. महापालिका अतिरिक्त आयुक्त (2) अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सह-शहर अभियंता, ह प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई केली. या कारवाईत 3 उप-अभियंता, 5 कनिष्ठ अभियंता, 12 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), महापालिका व अतिक्रमण विभाग कर्मचारी यांनी या कारवाईत भाग घेतला. 6 जेसीबी, 2 डंपर, 2 ट्रॅक्टर ब्रेकर व 24 मजुर यांच्यामार्फत ही कारवाई केली.
कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिका पोलीस कर्मचारी, सांगवी पोलीस ठाण्याकडील 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी तसेच पोलीस आयुक्तालयाचे 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक, 34 आरसीपी जवान व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.