मुंबई :- भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज(२६ जुलै) रात्री ८ ते उद्या (२७ जुलै) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. मुंबई शहर व उपनगरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे गुरुवार दि. 27 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
तसेच, या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सुध्दा मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुटी जाहीर केली आहे.
तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन देखील BMC कडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात आता मान्सून आणखी दमदारपणे कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा “रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा “यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.