अबुधाबी -आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफ गटात स्थान मिळवण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न अखेर धुळीला मिळाले. स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अखेरच्या साखळी लढतीत मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा 42 धावांनी पराभव केला. मात्र, सामना जिंकूनही मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी केलेली खेळी अखेर व्यर्थ ठरली. मुंबईला समिकरणानुसार विजय मिळवता न आल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 236 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनेही चमकदार खेळ केला. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. जेसन रॉय व अभिषेक शर्मा यांनी संघाला 64 धावांची सलामी दिली. जेव्हा त्यांच्या 64 धावा फलकावर लागल्या तेव्हाच या स्पर्धेतील मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.
मुंबईला हा सामना 171 धावांनी जिंकणे प्लेऑफमधील स्थानासाठी आवश्यक होते. एका बाजूने खेळपट्टीवर पाय रोवून उभा असलेल्या मनीष पांडेला प्रियम गर्गने साथ देत संघाचा डाव सावरला. या जोडीने संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान पांडेने आपले अर्धशतक पूर्ण केले. समोरून अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने हैदराबादला हा सामना 42 धावांनी गमवावा लागला. पांडे 41 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या.
सलामीवीर इशान किशन व मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 बाद 235 असा धावांचा डोंगर उभारला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहितने इशान किशनसह डावाची सुरुवात अत्यंत धडाक्यात केली. या जोडीने 6 व्याच षटकात 80 धावांची सलामी दिली. यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट दिसत होता. रोहित पुन्हा एकदा स्थिरावल्यानंतरही बाद झाला. तसेच किशन व सूर्यकुमार बाद झाल्यानंतर त्यांचा डाव संकटात आला.
किशनला शतकी पल्ला पार करता आला नसला तरीही त्याने अफलातून खेळी केली. त्याला उमरान मलिकने तंबूत पाठवले. किशनने आपल्या 84 धावांच्या खेळीत अवघ्या 32 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 4 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यानंतर सूर्यकुमारने 82 धावांच्या खेळीत 40 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 3 षटकार फटकावून बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 9 बाद 235 धावा. (इशान किशन 84, सूर्यकुमार यादव 82, रोहित शर्मा 18, कॅरन पोलार्ड 13, हार्दीक पंड्या 10, जेसन होल्डर 4-52, अभिषेक शर्मा 2-4, रशिद खान 2-40). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 8 बाद 193 धावा. (जेसन रॉय 34, अभिषेक शर्मा 33, प्रियम गर्ग 29, मनीष पांडे नाबाद 69, जेम्स निशाम 2-28, जसप्रीत बुमराह 2-39, नाथन कुल्टरनाइल 2-40, ट्रेंट बोल्ट 1-30, पियुष चावला 1-38).