Mumbai Airport – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) अर्थातच टर्मिनल 2 उडवण्याची धमकी देणारा मेल आल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणात धमकी देणाऱ्या युवकाला एटीएसने त्रिवेंद्रममधून ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक तपास सध्या सुरु आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा मेल आला होता. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
स्फोट टाळण्यासाठी 48 तासांत 10 लाख डॉलरची मागणी या मेलद्वारे करण्यात आली होती. बिटकॉइनमध्ये या युवकाने पैशांची मागणी केली होती. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 385 आणि 505 (1) (बी) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता.