चेन्नई -आयपीएल स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ असे संबोधले जात असलेले मुंबई इंडियन्स आज दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. या स्पर्धेतील विजेतेपदासह एकूण सहावे विजेतेपद साकार करण्यासाठी वाटचाल करत असलेल्या मुंबईला आज दिल्लीचा अडथळा दूर करावा लागणार आहे.
दिल्लीच्या संघाने यंदा कात टाकली असे चित्र असले तरीही त्यांच्याकडे सातत्याचा अभाव दिसत आहे. या सामन्यात बलाढ्य मुंबईच्या अत्यंत भेदक गोलंदाजाचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या सामन्यात अफलातून फलंदाजीचे दर्शन घडवले होते. मात्र, त्यानंतर त्यांना यश आलेले नाही.
पृथ्वी शॉ व शिखर धवन या जोडीवर त्यांच्या आशा आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने 92 धावांची खेळी करत फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. आतापर्यंतच्या सामन्यात धवनने 186 धावा करत ऑरेंज कॅप मिळविली आहे. यामुळे दिल्लीच्या आशा पल्लवती झाल्या आहेत. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतनेही दर्जाला साजेशी कामगिरी केली आहे.
गेल्या स्पर्धेतील सर्वात यशस्वी ठरलेला अष्टपैलू मार्कस स्टोनिस यंदाच्या स्पर्धेत फिका पडला आहे. तसेच गेल्या वर्षी अमिरातीची मैदाने दणाणून सोडलेला शिमरन हेटमायर याला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे दिल्लीला सेकंड बेंचचा विचार करावा लागणार आहे.
यंदाच्याही स्पर्धेतही मुंबईचा संघ परिपूर्ण वाटतो. कर्णधार रोहित शर्माचे अफलातून नेतृत्व त्यांना सातत्याने विजयी मार्गावर नेत आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी व रोहितचे निर्णय संघाच्या फायद्याचेच ठरत आहेत. फलंदाजी तर भक्कम आहेच पण गोलंदाजीतही त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत.
त्यांनी हे सातत्याने सिद्धही करून दाखविले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी विजय खेचून आणत आम्हीच स्पर्धेचे बॉस असल्याचे सिद्ध केले आहे. उलटपक्षी दिल्लीच्या गोलंदाजांना मुंबईच्या खोलवर असलेल्या फलंदाजीवर वर्चस्व राखण्याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.
रोहितकडून अपेक्षा
यंदाच्या स्पर्धेत मुंबईचा संघ जरी सातत्यपूर्ण कामगिरी करत असला किंवा कर्णधार रोहित शर्माचे निर्णयही सार्थ ठरत असले तरीही वैयक्तिक कामगिरीबाबत रोहित फारसा यशस्वी ठरलेला नाही. तो सुरुवात चांगली करत असला तरीही त्याच्याकडून आता मोठ्या खेळीची संघाला गरज आहे.
सामन्याची वेळ –
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टसवर