नवी दिल्ली -पोलंडमधील किएल्स येथे सुरू असलेल्या युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी धडाका कायम राखला आहे. आशियाई चॅम्पियन विंका आणि अल्फिया पठाणसह चार बॉक्सरने उपांत्यफेरीत प्रवेश करत आपले पदक निश्चित केले आहे. विंका आणि अल्फिया यांच्याशिवाय गीतिका आणि पूनम यांनीही उपांत्यपूर्व फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करत आगेकूच केली आहे. तसेच पुरुष गटात सुमित आणि मनीष हे पदकापासून एक पाऊल दूर आहेत. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पानिपतची बॉक्सर विंकाने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाची प्रतिस्पर्धी कॅमिलो कॅमेलावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. तर 2019मधील आशियाई ज्युनियर चॅम्पियन अल्फियाने हंगेरीच्या रेमा हॉफमॅनला पराभूत केले. ही विजयी मालिका पूनमने कझाकिस्तानच्या नाझर्के सेरिकवर 5-0 असा सहज विजय मिळवित उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. तसेच गीतिकाने 48 किलो वजनी गटात रोमानियाच्या एलिझाबेथ ओस्टरवर सहज मात केली.
81 किलो वजनीगटात खुशीला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला तुर्कीच्या बुसरा इसिल्डरने पराभूत केले. दुसरीकडे पुरुष गटातील 60 किलो वजनीगटात आकाश आणि 81 किलो वजनीगटात विनीतचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
सुमित, मनीषचीही आगेकूच
पुरुष गटात भारताच्या सुमित आणि मनीष यांनी आपली आगेकूच कायम ठेवत पदकापासून ते एक पाऊल दूर आहेत. त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सुमितने जॉर्डनच्या अब्दुल्लाह लारगला 5-0, तर मनीषने स्लोव्हाकियाच्या लादिसलाव होरवाथला 5-0 असे पराभूत केले.