मुंबई – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्यानेच 11 वर्षीय मुलीची हत्या केली आहे. या हत्येनंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. भूपेश पवार असे मृत पित्याचे नाव आहे. तर आर्या पवार हे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.
अधिक माहितीनूसार, मृत भूपेश पवार आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. मंगळवारी पत्नी बाहेर गेली असता त्याने आपल्या अकरा वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये भा.दं.वि कलम 302 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
भूपेश हा शेअर ब्रोकर म्हणून काम करायचा. तर त्याची पत्नी खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करते. रोजच्या प्रमाणे पत्नी तिच्या कामावर गेली. परंतु, सकाळी अकराच्या सुमारास तिने भूपेशला अनेक फोन केले मात्र त्याने ते उचलले नाहीत. संशयास्पद वाटल्याने पत्नीने घराकडे धाव घेतली. घरचा दरवाजा आतून बंद होता. नंतर तिने शेजाऱ्यांना व पोलिसांनाही कळवले. यानंतर पोलीस तातडीने घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना भूपेश पवार आणि आणि मुलगी दोघेही मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोने व पैसे भाच्याला द्या
घटनेच्या तपासाअंतर्गत पोलिसांना त्यांच्या घरात सुसाईड नोटही सापडली. त्यात “पत्नीसोबत झालेल्या वादामुळे हे पाऊल उचलले आहे. आपल्यानंतर मुलीची फरफट होऊ नये म्हणून तिला संपविल्याचे त्यांने सुसाइड नोट मध्ये नमूद केले आहे. तसेच माझा पैसा, सोने आणि घर माझ्या भाच्याला द्यावे, असेही त्यामध्ये म्हटले होते. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी घरातील 9 ते 10 तोळे सोने आणि 9 लाख रुपयांची रोख रक्कम काढून त्याने जमिनीवर ठेवली होती. हीच रक्कम भाच्याला देण्याचा नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.