मुंबई – मालाड परिसरातील एका व्यावसायिकाला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धमकी एका अज्ञान व्यक्तीने फोनवरून धमकी दिली. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगत एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तक्रारदार व्यावसायिकाकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. 20 जुलै रोजी एका खासगी क्रमांकावरून हा फोन आला होता, असे तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तीन सदस्य सध्या तुरुंगात आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे आम्हाला तातडीने 20 लाख रुपये दे, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिली. यानंतर संबंधित व्यावसायिकाने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.