– आशिष निनगुरकर
मनामनाला, तनामनाला रोमांचित करणारा पाऊस म्हणजे हवाहवासा फिल्मी स्टाइल पाऊस! फिल्मी स्टाइल पाऊस खोटा जरी असला तरी तो खरा भावस्पर्श देतो, रोमांचित करतो अन् मोहरूनही टाकतो. या पावसाची फिल्मी दुनियेत विविध रूपं आहेत. फिल्मी पावसात मारलेला हा एक फेरफटका…
पाऊस म्हटलं की, मस्तपैकी गरमागरम कांदाभजी किंवा पोहे आणि चहा यांचा आस्वाद ओघाने आलाच. अनेक जोडपी फिल्मी पावसात आपला आधार शोधतात. बॉलीवूडच्या काही रोमॅंटिक गाण्यांमध्ये स्वत:ला हरवून जातात. पावसात डान्स… पावसात ढिशूम ढिशूम… विजांच्या कडकडाटात विपरीत घडण्याचं संकेत देणारा पाऊस… मंदिरात शंकराच्या मूर्तीसमोर नायक मोठमोठ्याने डॉयलॉगबाजी करतो तेव्हा ऑटोमॅटिक हलणाऱ्या घंट्या आणि विजांचा कडकडाट होऊन बरसणारा पाऊस… दोन नायकांमध्ये तुंबळ हाणामारी होताना बरसणारा पाऊस… दु:खी, कष्टी, रडवेल्या चेहऱ्याने विरहात, दु:खात, कारुण्यात हिरो गाणं म्हणताना कोसळणारा पाऊस… जसी सिच्युएशन तसा पाऊस! म्हणजेच हरतऱ्हेच्या सिच्युएशनशी जुळवून घेणारा पाऊस, असा तुम्हा-आम्हा सर्वांचा फिल्मी पाऊस !
“रोटी, कपडा और मकान’मधील “हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दुरी’ साडीतली “हॉट अँड बोल्ड’ झीनत नखरेल अदांनी नायक मनोजकुमारला खुणावते, तेव्हाचा तो सही एन्ट्री घेणारा पाऊस, झीनतच्या अदांनी बसल्या खुर्चीवर रसिकांना चिंब करून जाणारा पाऊस आणि लतादीदींचा तो अतिशय गोड आवाज, पडद्यावर चिल्लरची दिलखुलास उधळण करून गेला होता. 47 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या भर उन्हाळ्यात आजही हे गाणं पाहिलं की, चिंब व्हायला होतं, एवढी जादूभरी नजाकत त्यात भरली आहे.
“एक लडकी भिगी भागी सी’ पावसात भिजून गॅरेजमध्ये आलेल्या सौंदर्यसम्राज्ञी मधुबालाकडे पाहात, वेड्यावाकड्या तोंडाने तिला “उसका भी तो पेच कोई ढिला है…’ म्हणणारा नायक-गायक किशोरकुमार आणि गीतकार मजरूह सुल्तानपुरी आणि सौंदर्य अप्सरा मधुबाला असं दृश्य डोळ्यापुढून जात नाही. “चॉंदनी’ चित्रपटातील थोडा प्रौढ झालेला नायक विनोद खन्ना पहिल्या पत्नीच्या विरहात व्याकुळ होत गातो, तेव्हा तो, “लगी आज सावन की फिर वो झडी है’ असा दर्दभरा गातो. तेव्हाचा तो विरहात पडणारा पाऊसही सिच्युएशनला समरूप ठरतो.
शिव-हरी, यश चोप्रा, सुरेश वाडकर, ऋषी-विनोद आणि चुलबुली श्रीदेवी ही टीम “चॉंदनी’ लक्षात राहिली. “प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यू डरता है दिल…’ केवढे सुंदर बोल शैलेंद्रच्या या गीतातले, लता-मन्नादांनी किती सुरेख गायलं! राजकपूरचा तो बोटभर आखूड पॅंट, डोक्यावरची ती टोपी, ते त्रासिक चेहरा करत, “कहता है दिल रस्ता मुश्कील’ असं राजला म्हणणं… असं म्हणणं म्हणजे प्रेमात पडूनही केवढी समजदारी होती ती! आजच्या पिढीतल्या प्रेमवीरांसाठी हे बोल म्हणजे धडा घेण्याजोगेच आहे. राज-नर्गिस यांचं ते एकाच छत्रीत येणं, वरून सुरू असलेला पाऊस, “फिर भी रहेंगी निशानियॉं’ हे सूचक सत्यबोल ऐकवणं, इतक्या वर्षांनंतर आजही लक्षात राहिलं. “आज रपट जाए तो हमे ना उठय्यों’ महानायक अमिताभ आणि व्यावसायिक तसेच कलात्मक या दोन्ही चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटविणारी मराठमोळी स्मिता पाटील, यांचं हे धमाल पाऊस गीत!
“लगान’ चित्रपटातील भुवन, राधा आणि त्याच्या टीमचं “घनन घनन घीर घीर आए बदरा’ तसेच विधू विनोद चोप्रांच्या 1942 “अ लव्ह स्टोरी’मधील अनिल कपूर आणि मनीषा कोइरालावरील “रिमझिम रिमझिम’, जनता हवालदारमधलं पावसातलं “हमसे का भूल हुयी, जो ये सजा हमको मिली’, मिकाच्या आवाजातलं “सावन में लग गई आग, दिल मेरा है’, शुभा मुद्गल यांच्या आवाजातलं “अब के सावन, ऐसे जम के बरसे…’ अशी सुंदर पाऊस गाणी सर्वांच्याच ओठी आहेत.
1994 मध्ये प्रदर्शित झालेला “मोहरा’ चित्रपटातील “टिप-टिप बरसा पानी’ गाण्यात अक्षयकुमार आणि रविना टंडन या जोडीत कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. हे गाणं अक्षयनं कॅटरिनासोबत रिक्रिएटही केलं. पण ते काही खास जमलं नाही. “गुरू’ चित्रपटातील “बरसो रे मेघा’ हे गाणे आणि पाऊस तुम्ही चुकवू शकत नाही. त्यावर ऐश्वर्या रायचा डान्स परफॉर्मन्स म्हणजे त्यावर लागलेले चार चांदच जणू. अमिताभ आणि मौसमीचं “रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन’ आणि “चालबाज’ मधल्या श्रीदेवीच्या “किसी के हाथ ना आयेगी ये लडकी’ने तसेच किशोरदा आणि मधुबालाची “उसका कोई पेच भी ढिला है’ म्हणत निर्मळ चिडवाचिडवी आणि श्रीदेवीचा एकटीचाच भन्नाट बेभान आणि तरीही निरागस डान्स हे दोन्ही आपल्या चेहऱ्यावर मिश्कील स्टॅंप उमटवून गेले.
बॉलीवूड आणि पाऊस यांची एक वेगळीच केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत असते.
चित्रपट कोणत्याही ऋतूतं रिलीज होऊ देत बऱ्याच चित्रपटात आपल्याला पावसातील रोमॅंटिक सीन पाहायला मिळाला आहे. राज कपूर-नर्गिस यांच्यापासून ते अक्षयकुमार-रविना टंडन आणि शाहरुख खान-माधुरी दीक्षित तसेच नव्या दमाच्या अर्जुन कपूर-श्रद्धा कपूर या स्टार्संनी पावसात आपल्या नृत्याचा देखावा दाखवला आहे. पाऊस आणि प्रेमाचं कनेक्शन खूप जुनं आहे. अशा या पावसाचा सिनेमातला रोल पुढे पुढे जात राहिला आणि आपण तो आपापल्या नजरेने पाहात राहिलो, स्वीकारत राहिलो. अजून कितीतरी आहे या सिनेमातल्या पावसाबद्दल सांगण्याजोगं, पण तुम्हीच आपापल्या स्वभाव प्रकृतीप्रमाणे तुम्ही अनुभवलेला, साक्षीदार ठरलेला सिनेमातला पाऊस आठवा.