वारजेतही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

महापालिकेच्या जागेवर बांधण्यासाठी निविदा प्रसिद्ध ः 95 कोटी रुपये खर्च अपेक्षित

पुणे  – वारजे येथील महापालिकेच्या जागेवर ससूनच्या धर्तीवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर बांधण्याची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. ही निविदा देशपातळीवर देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी निविदा प्रसिद्ध केली आहे.

वारजे सर्व्हे नं. 79/बी येथे 10 हजार 901 चौ. मी. चा महापालिकेच्या मालकीचा भूखंड आहे. यावर हॉस्पिटलचे आरक्षण टाकण्यात आले आहे. येथे हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा हा प्रस्ताव आहे.

250 खाटांचे हे हॉस्पिटल बांधण्याचे नियोजित असून त्यासाठी किमान 95 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत 30 वर्षांचा करार करण्यात येणार असून त्यामध्येच हॉस्पिटलची इमारत बांधण्याचे दोन वर्ष गृहित धरण्यात आले आहेत.

महापालिका केवळ जागा देणार असून तेथे रुग्णालय बांधून घेण्याची जबाबदारी ज्यांची निविदा मंजूर झाली आहे. त्या ग्रुपची असणार आहे. या बांधकामासाठी 1.1 बेसिक एफएसआय आणि 0.5 हा प्रीमियम एफएसआय मिळणार आहे. या बदल्यात महापालिकेसाठी 30 टक्‍के जागा राखीव असणार आहे. त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील रुग्ण आणि शहरी गरीब योजनेतील रुग्ण यांचा समावेश असणार आहे.

महापालिकेत निवडून आलेले सदस्य आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठीही येथे उपचार होणार असून उपचाराची 10 टक्‍के रक्‍कम संबंधित सदस्य किंवा कर्मचाऱ्यांनी भरायची आणि 90 टक्‍के रक्‍कम महापालिका देणार आहे. महापालिकेच्या माजी सदस्य आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपचारातील 50 टक्‍के खर्च महापालिका देणार असून, 50 टक्‍के खर्च संबंधित रुग्णाला करावा लागणार आहे.

दारिद्रय रेषेखालील रुग्णांसाठी 10 टक्‍के राखीव जागा
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 85 हजार रुपयांच्या आतील आहे अशा दारिद्रय रेषेखालील रुग्णांसाठी 10 टक्‍के जागा आणि महापालिकेने पाठवलेल्या रुग्णांसाठी 5 टक्‍के जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत. या सगळ्यांना मोफत उपचार देणे बंधनकारक असणार आहे.

याशिवाय ज्यांचे वार्षिक उत्पन्न 85 हजार रुपये आहे; परंतु ते एक लाखाच्या आत आहे अशा दारिद्रय रेषेखालील रुग्णांसाठी 10 टक्‍के जागा तर याच वर्गातील महापालिकेने पाठवलेल्या रुग्णांसाठी 5 टक्‍के जागा राखीव ठेवायच्या आहेत. मात्र, या रुग्णांना मोफत उपचार मिळणार नसून एकूण उपचार खर्चाचा 50 टक्‍के खर्चच महापालिका देणार आहे. उरलेला खर्च संबंधित रुग्णांनी करणे आवश्‍यक आहे, असे निविदेत नमूद केले आहे.

ठराविक रुग्णालयाला डोळ्यापुढे ठेवून निविदा प्रक्रिया

ठराविक रुग्णालयाला डोळ्यापुढे ठेवून ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या निविदेतील अटीशर्तीं पाहिल्यास ही बाब समोर येते. यामध्ये दिलेल्या अटींमध्ये असे नमूद केले आहे की, जे आधीपासूनच हॉस्पिटल चालवतात आणि त्यांची वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशांनीच निविदा भरायची आहे.

याशिवाय ते 125 खाटांचे आधीच हॉस्पिटल चालवत असले पाहिजेत. म्हणजे त्यांना तो अनुभव असला पाहिजे. या अटींमुळे कोणत्यातरी एका ग्रुपला डोळ्यापुढे ठेवून ही निविदा तयार करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. ही आसामी कोण, याचा तपास निविदा उघडल्यानंतर होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.