पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुणेरी बाप्पा संघाने छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघाचा 7 गडी राखून पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पुणेरी बाप्पाच्या जलदगती गोलंदाज सचिन भोसलेने चौथ्याच चेंडूवर मुर्तझा ट्रॅकवालाला त्रिफळा बाद केले व छत्रपती संभाजीनगर किंग्जला पहिला धक्का दिला. त्याचवेळी संभाजीनगरच्या ऋषिकेश दौंडला पियुष साळवीने झेल बाद केले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघ 1.4 षटकात 2 बाद 7 अशा स्थितीत सापडला. त्यानंतर सौरभ नवले (31 धावा) व ओम भोसले (10 धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 32 चेंडूत 43 धावांची भागीदारी केली.
छत्रपती संभाजीनगर किंग्जचे फलदांज लय पकडत असतानाच सौरभ नवलेला पुण्याच्या आदित्य डावरेने झेलबाद करून संघाला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर अभिषेक पवार (18 धावा) व ओम भोसले या जोडीने पाचव्या गड्यासाठी 30 चेंडूत 38 धावांची भागीदारी केली.
अखेरच्या सत्रात हितेश वाळुंज (नाबाद 19) व शमसुजमा काझी (नाबाद 10 धावा) यांनी नवव्या गड्यासाठी 26 चेंडूत 28 धावांची भागीदारी करून संघाला 146 धावांचे आव्हान उभे करून दिले. पुणेरी बाप्पा संघाकडून पियुष साळवी (2-36), रोहन दामले (2-28), सचिन भोसले (1-8), यश क्षीरसागर (1-14) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
146 धावांचे आव्हान पुणेरी बाप्पा संघाने केवळ 16.2 षटकात 3 बाद 147 धावा काढून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज आदर्श बोथरा (1 धाव) ला रामेश्वर दौडने बाद केले. त्यानंतर पवन शहाने 32 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा चोपल्या. पवन व यश क्षीरसागर (35 धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 30 चेंडूत 69 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला.
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने 18 चेंडूत 1 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 29 धावा व अद्वैय शिधयेने नाबाद 23 धावा केल्या. ऋतुराज आणि अद्वैय यांनी चौथ्या गड्यासाठी 30 चेंडूत 37 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक
छत्रपती संभाजीनगर किंग्ज : 20 षटकात 8 बाद 146 धावा. (ओम भोसले 46, सौरभ नवले 31, अभिषेक पवार 18, शमसुजमा काझी नाबाद 10, हितेश वाळुंज नाबाद 19, पियुष साळवी 2-36, रोहन दामले 2-28, सचिन भोसले 1-8, यश क्षीरसागर 1-14) पराभूत वि. पुणेरी बाप्पा : 16.2 षटकात 3 बाद 147 धावा. (पवन शहा 54, यश क्षीरसागर 35, ऋतुराज गायकवाड नाबाद 29,अद्वैय शिधये नाबाद 23, रामेश्वर दौड 1-21, हितेश वाळुंज 1-21, शमसुजमा काझी 1-33).