वडूज (प्रतिनिधी) – दिवंगत वडिलांच्या स्मृती दीर्घकाळ चिरंतन राहव्यात या उद्देशाने खटाव तालुक्यातील मांडवे येथील खाडे बंधूंनी वडील ज्या पारावर नेहमी बसायचे, त्या मंदिरासमोरील पाराचा स्वखर्चाने जीर्णोध्दार केला. सुमारे एक लाख रुपये खर्च करून आठ दिवसांत काम पूर्ण केले आहे.
या विधायक कामाचा लोकार्पण सोहळा वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज व येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच सागर चंदनशिवे, विकास सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील, हनुमान यात्रा कमेटीचे अध्यक्ष आकाराम खाडे, पै. तुकाराम पाटील,प्रकाश ढोले, विजय खाडे, सुरेश खाडे, नंदकुमार देशमुख, लक्ष्मण खाडे, उमेश पाटील, रायसिंग खाडे, गणपत खाडे, दादासाहेब खाडे,जिजाबा डोईफोडे, उत्तम क्षीरसागर, शांताराम क्षीरसागर, चंद्रहार खाडे यांची उपस्थिती होती.
मांडवे येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खाडे, ज्ञानेश्वर खाडे, नामदेव खाडे यांचे वडील कै. विष्णूपंत बाबा खाडे हे कायम ग्रामदैवत श्री हनुमान देवालयाच्या समोरील पारावर बसायचे.दोन महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र तुकाराम हे आयोध्या येथे राम लल्लाच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांना पाराचे सुशोभीकरण करण्याची कलपना सुचली.
घरी माघारी परत आल्यानंतर त्यांनी दोन बंधू व गावातील प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून पाराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले.या उपक्रमाचे विठ्ठलस्वामी, श्री. क्षीरसागर, सरपंच श्री. चंदनशिवे, पोपटराव पाटील आदींनी कौतुक केले. यावेळी पांडुरंग खाडे यांनी प्रास्ताविक केले. गणपत खाडे यांनी स्वागत केले. तुकाराम खाडे यांनी आभार मानले.