चेन्नईमधील संस्थेकडून संसद महारत्न पुरस्कार प्रदान
बारामती/ जळोची – सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार फाउंडेशनचे के. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सन्मान आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. खासदार सुळे यांची उपस्थिती, चर्चेतील सहभाग, उपस्थित प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयकांसाठी सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. यंदा त्यांना संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कारही प्रदान केला आहे.
फेब्रुवारीत पुरस्काराची घोषणा केली होती. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु केला आला आहे, असे फाउंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. याबद्दल पक्षाचे तसेच माझ्या संसदीय कामकाजात माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, संसदेतील स्टाफ आदी सर्वांचे मनापासून आभार. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम करीत आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार, बारामती.