मुंबई : खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट जारी करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांविरोधात दोन महिन्यात दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात न्यायालयाने 6 सप्टेंबरच्या सुनावणीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या हजेरीतून सूट देण्याच्या अर्जास परवानगी दिली होती. मात्र गुरुवार 22 सप्टेंबरच्या सुनावणीत दोन्ही आरोपी पुन्हा गैरहजर राहिले.
राणा यांच्या वकिलाने पुन्हा हजेरीतून सूट आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगितीसाठी अर्ज केले होते. मात्र दोन्ही अर्ज फेटाळत न्यायालयानं दोघांविरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीला दोघांना पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागले अथवा सत्र न्यायालयात दाद मागावी लागेल. त्यामुळे आता नवनीत राणा नेमकं कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.