नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यांना उत्तर प्रदेशातील रामपुर येथील न्यायालयाने दिलासा दिला आहे. जयाप्रदा यांच्या विरोधात जारी करण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने मागे घेतले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आज म्हणजे सोमवारी जयाप्रदा न्यायालयात अचानक प्रकट झाल्या होत्या.
न्यायालयाने त्यांचे विनंतीपत्र मान्य केले आहे. २० हजार रूपयांच्या चार जणांच्या हमीवर त्यांना दिलासा देण्यात आला आहे मात्र पुढील प्रत्येक सुनावणीच्या वेळी जयाप्रदा यांना हजर राहावे लागेल असे सांगण्यात आले आहे.
आचारसंहिता उल्लंघनाच्या दोन प्रकरणांत जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. रामपुरच्या एमपी एमएलए न्यायालयाने त्यांच्या विरोधात तब्बल ७ वेळा वॉरंट बजावले होते व त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
गेल्या सुनावणीच्या वेळीही त्या गैरहजर राहील्यामुळे न्यायालयाने जयाप्रदा यांना फरार घोषित केले होते. त्यामुळे त्या आज न्यायालयात उपस्थित झाल्या होत्या. या खटल्यात आता पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे.२०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील आचार संहिता उल्लंघनाची ही प्रकरणे आहेत.