जात प्रमाणपत्राला हायकोर्टात आव्हान
मुंबई – अमरावती राखीव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या अपक्ष नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणी वाढत आहे. त्यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आल्यानंतर त्यांना मुंबई जातपडताळणी कमिटीने दिलेल्या जाती प्रमाणपत्राला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मानवर यांच्यावतीने ऍड. प्रमोद पाटील यांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहे. न्यायमूर्ती कुरेशी आणि न्यायमूर्ती काथावाला यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित केली आहे.
नुकत्याच झालेला अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा यांनी विजय हासील केला. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणूकीत राणा यांनी मोची जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढविली. त्यांच्या या निवडीला नागपूर खंडपीठासमोर आव्हान याचिका दाखल करण्यात आली.
राणा पंजाब येथील लुभाणा जातीच्या असल्याने अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी राणा अपात्र होत्या. त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी, त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर राणा यांनी निवडणूक लढविताना मुंबई जातपडताळणी कमिटीने दिलेल्या मोची जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले. या जातप्रमाण पत्रालाच आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.