मुंबई, – दादरा नगर हवेलीतून सात वेळा लोकसभेवर निवडून आलेले अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत आत्महत्या केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मरिन ड्राईव्ह भागातील एका हॉटेलात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी डेलकर यांच्या कुटुंबियांना मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
डेलकरांनी मृत्यपुर्व एक चिठ्ठी लिहून ठेवली असून ही पंधरा पानी चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यांनी स्वत:च्या लेटरहेडवर ही चिठ्ठी लिहीली असून त्यात त्यांनी दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांकरवी आपल्याला कसा त्रास देण्यात आला याचा तपशील त्यांनी लिहीला आहे. हे प्रशासक भाजपचे नेते असून ते पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाच्या काळात हे प्रफुल्ल खोडा पटेल नावाचे प्रशासक तेथे गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. डेलकर हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच विधानसभेतही केली होती. आपल्या वडिलांच्या मृत्युला भाजपचे प्रफुल्ल खोडा पटेल हेच जबाबदार असल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.