पुणे – सहकारनगर पोलिसांनी धनकवडीतील एका तरुणाकडून गावठी पिस्तूल आणी काडतूसे जप्त केली. त्याच्यावर आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश राजेश रेणूसे (22,रा.खळदकर चाळ, धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
सहकारनगर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना खबर मिळाली की, धनकवडीतील स्मशानभूमीच्या पाठिमागे एक तरुण कंबरेला पिस्तूल लावून थांबला आहे. त्यानूसार वरिष्ठांच्या आदेशानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, एक गावठी कट्टा व एक काडतूस असा 30 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.एस.घाडगे, पोलीस हवालदार विजय मोरे, बापु खुटवड, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, सतिश चव्हाण, भुजंग इंगळे, संदिप ननवरे, महेश मंडलिक, शिवलाल शिंदे, प्रदिप बेडिस्कर यांच्या पथकाने केली.