डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सिनेमांनाही पुरस्कार मिळावेत

सध्या कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर बरेच निर्माते सिनेमे डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करत आहेत. भूमी पेडणेकरचा “दुर्गावती’देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळेच भूमी पेडणेकरने डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सिनेमांनाही पुरस्कार मिळायला पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे. पुरस्कारांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या सिनेमंचा विचार व्हायला हवा अशी आग्रही मागणी तिने केली आहे. “दुर्गावती’च्या निर्मितीच्यावेळी प्रेक्षकांना थिएटरमध्ये तो बघायला मिळावा, अशी अपेक्षा होती. 

मात्र त्यानंतर लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि सर्वच निर्मात्यांनी थिएटर ऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करायचे ठरवले. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात सिनेमे रिलीज होत आहेत. याची दखल घेतली जायला हवी. त्यामुळे या सिनेमांचाही विचार पुरस्कारांसाठी व्हायला हवा, असे भूमी म्हणाली. भूमीचे यापूर्वीचे “डॉली किटी और वो चमकते सितारे’देखील डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. 

त्या सिनेमाला ज्याप्रमाणे प्रेक्षक आणि विश्‍लेषकांची पसंती मिळाली होती, तशीच “दुर्गावती’लाही मिळेल, अशी तिला खात्री वाटते आहे. “दुर्गावती’चे नाव आता बदलून “दुर्गामती’ करण्यात आले आहे. हे नाव का बदलले गेले आहे, हे मात्र स्पष्ट केले गेलेले नाही. हा एक हॉरर ड्रामा असून त्यात भूमी पेडणेकरबरोबर अक्षय कुमारदेखील असणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.