दीपक ढोबळे यांचा इशारा ः जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
मंचर – जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांकडुन अपंग कायदा 2016चा वापर प्रभावी होत नाही. प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल. याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी उदय जाधव यांना अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दिपक ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने सोमवार (दि. 6) दिले.
दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा उद्देश ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीने बांधलेले व्यवसाय व बाजार गाळे यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना 5 टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद पुणे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना व्यवसाय गाळे दिव्यांग व्यक्तींना राखीव ठेवण्याचे आदेश दिले; मात्र अद्यापपर्यंत हे कायदे व पत्रव्यवहार कागदावरच राहिले. गटविकास अधिकारी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
अपंग व्यक्तींनी शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीकडे व्यवसाय गाळा मागणी केली असता हे व्यवसाय गाळे 99 वर्षांच्या करारावर दिले असल्याने तुम्हाला देता येणार नाही. अशी उत्तरे सरपंच व ग्रामसेवक देतात. ज्या ग्रामपंचायती दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय गाळे देत नसेल. त्या सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून गटविकास अधिकाऱ्यांसह सेवा हमी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. प्रत्येक पंचायत समितीमध्ये दिव्यांग व्यक्तींचा त्रास बंद करण्यासाठी व सहानुभुती मिळण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कक्ष राखीव ठेवावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
याबाबत आंदोलनाची पहिली सुरुवात सोमवारी (दि. 13) पंचायत समिती घोडेगाव येथे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे लावून केली जाईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, जिल्हाध्यक्ष अनिल मेमाणे, आंबेगाव तालुका अध्यक्ष समीर टाव्हरे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्थेचे सचिव पांडुरंग काळे, पूनम काळे, शोभा पिंगळे, सविता मुंढे, शोभा यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.