पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयामध्ये गिर्यारोहक समन्वयाचे काम करणार आहे. या कामासाठी 40 हून अधिक गिर्यारोहक स्वयंसेवकांची फळी सज्ज झाली आहे.
जम्बो कोविड रुग्णालयात त्रुटी आढळून आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने सदर रुग्णालय सुव्यवस्थित व सुरळीत करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा गिर्यारोहकांकडे मदतीचा हात मागितला आहे. या आवाहनाला साद देत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आपल्या 40 हून अधिक स्वयंसेवकांची फळी सज्ज केली आहे.
महासंघाचे स्वयंसेवक गुरुवारपासून दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत विविध गटांमध्ये सीओईपी जम्बो सेंटर येथील रिसेप्शन सेंटर येथे ऍडमिन कामांमध्ये मदत, तसेच रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण व त्यांच्या चौकशीसाठी आलेले नागरिक यांच्यातील समन्वयाचा दुवा म्हणून काम करतील.
याआधी जुलै व ऑगस्टमध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाच्या 100 हून अधिक स्वयंसेवकांनी कोविड सेवक म्हणून काम केले होते. महापालिका प्रतिनिधी आणि महासंघाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीप्रेमी संस्थेचे अजित ताटे, सचिन गायकवाड व आनंद दरेकर उपस्थित होते.