- नियोजन, उपाययोजना बैठक : सत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाचे 70 टक्के रुग्ण
तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण तळेगाव दाभाडे शहरात आढळले आहेत. आतापर्यंत 750 जणांना करोनाची बाधा झाली असून, 31 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शहरात 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 75 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे आता पुढे नगरपरिषद हद्दीत जनजागृती करण्यात येणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
येथील नगरपरिषदेच्या हद्दीत दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने नियोजन व उपाययोजना बैठकीचे मंगळवारी (दि. 8) सभागृहात आयोजन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, नगरसेवक गणेश खांडगे, सुशील सैंदाणे, अमोल शेटे, अरुण माने, संतोष भेगडे, निखील भगत, रोहित लांघी, नगरसेविका हेमलता खळदे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, अनिता पवार, संगीता शेळके, संध्या भेगडे, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तळेगाव दाभाडे हद्दीत सोमवारपर्यंत (दि. 7) 750 रुग्ण करोना विषाणू बाधित झाले. आतापर्यंत तळेगाव दाभाडे शहरात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव दाभाडे हद्दीत 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे रुग्ण 75 टक्के आहेत. त्यांना अगोदरच अनेक प्रकारचे आजार होते. तळेगाव दाभाडे हद्दीत 4.24 टक्के मृत्यूदर वाढला आहे. नागरिकांनी करोनाबाबत सतर्क राहण्याबाबत पुन्हा जनजागृती करणार आहे.
तळेगाव दाभाडे “हॉटस्पॉट’ झाले असून, हद्दीतील रुग्णांची करोना तपासणी करणाऱ्या 12 लॅबने करोना अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्यावर त्वरित अहवालाची प्रत नगरपरिषदेला पाठवावी.
करोनाबाधित रुग्णांना होम आयसोलेशन शिक्के मारण्यात येणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत गाव व ठाणे परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस दाहिनीवर ताण पडत आहेत. त्यासाठी लोणावळा, वडगाव, देहूरोड आदी ठिकाणी गॅसदाहिनी उभारण्याचे सूचना केल्या.
ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा प्रशासनावर वचक नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे, असा घराचा आहेर सैंदाणे यांनी दिला. रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांनी लॅबकडून रुग्णांशी होणारा “पॉझिटिव्ह’ व “निगेटिव्ह’ अहवालातील गोंधळ थांबवावा, असे प्रशासनाला सांगितले. करोनाची भीती दाखवून लूट करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करा, असेही किशोर आवारे यांनी सुचविले.