लोणंद – छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधलेल्या खडतर अशा किल्ले तोरणा अर्थात प्रचंडगडाची मोहीम लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी नुकतीच यशस्वी केली.
या मोहिमेत 12 वर्षांच्या मुलापासुन 58 वर्षांच्या नागरिकापर्यंत 47 जण सहभागी झाले होते. ऊन, सावलीचा खेळ व ढगामध्ये हरविलेला किल्ला चढताना दमछाक होते. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रचंडगड का ठेवले असेल, याची प्रचिती किल्ला सर केल्यानंतर येते.
पुणे जिल्ह्यात वेल्हे गावाजवळ असलेल्या किल्ले तोरणाची उंची 1403 मीटर म्हणजे 4604 फूट आहे. तोरणा गडावर झुंजार माची, बुधला माची, सदर, पाणी टाके आदी पाहण्यासारखे आहे. मुख्य दरवाजा बिनी दरवाजा, कोकण दरवाजाची रचना पाहण्यासारखी आहे. या गडावरून रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले दिसतात.
गुंजवणी धरणाचे विंहगम दृष्य, खोल दऱ्या डोळ्यांचे पारणे फेडतात. गडाला चारी बाजूंना असलेले बुरुज, तटबंदीही पाहण्यासारखी आहे. संपूर्ण तटबंदीच्या बाजूने चालण्यासाठी रस्ता आहे. झुंजार माचीकडे जाणारा मार्ग सर्वात खडतर आहे. काही ठिकाणी लोखंडी शिडी, ग्रिल बसवण्यात आले आहे; पण एक कडा घोरपडीप्रमाणे उतरावा व चढावा लागतो. मुख्य किल्ला चढतानाही काही ठिकाणी बसवण्यात आलेल्या ग्रिलचा आधार मिळतो. काही ठिकाणी मात्र कडा विनाआधार चढावा लागतो. गड चढताना त्याची भव्यता दिसते. या गडावरील तोरण जातीच्या झाडांमधून जाणारा मार्ग सुंदर आहे; पण एका बाजूला असलेली खोल दरी धोकादायक आहे.