पुणे – रेल्वेचे ऑनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्या दलालांविरुद्ध मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने विशेष अभियान राबवले. दि. 4 रोजी आरपीएफ पथकांकडून मध्य रेल्वे क्षेत्रात ट्रॅव्हल्स एजन्सींवर छापे टाकण्यात आले. यात एकूण 11.60 लाख रुपये, 380 ई-तिकिटे आणि अन्य साहित्य जप्त केले. संबंधित एजंटांविरोधात रेल्वे अधिनियम 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात पुण्यातही तिघांना अटक करण्यात आली आहे.
आरपीएफ पुणे पथकाने महादेवनगर येथील “ईझी टूर्स’वर छापा टाकला. यामध्ये 8,905 रुपयांची 7 ई-तिकिटे जप्त केली. याप्रकरणी हनुमंत शेंडगे याला अटक करण्यात आली.
कोंढवा येथे एम.के.मोबाइल ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 12,743 रुपयांची 6 ई-तिकिटे, 6,186 रुपयांची 3 वापरलेली ई-तिकिटे, 1 सीपीयू जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरफराज मन्सूल अली अहमद याला अटक करण्यात आली. मार्केटयार्ड येथील यश गिफ्ट शॉप येथे छापा टाकून 4,681 रुपयांची 2 ई-तिकिटे आणि 33, 511 रुपयांची 20 वापरलेली तिकीटे जप्त करण्यात आली. तर रमेशकुमार पुखराज जांगिड याला अटक करण्यात आली.
20 लाख रुपयांची तिकिटे रद्द
मध्य रेल्वेने दि. 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान 46 जणांना 490 तिकिटांसह अटक केली. या तिकिटांची एकूण किंमत 20 लाख 55 हजार 853 रुपये होती. अटक झालेल्या 46 दलालांना न्यायालयामध्ये हजर केले होते. आरपीएफच्या आदेशानुसार आयआरसीटीसीकडून ही सर्व तिकिटे रद्द करण्यात आली.
दलालांकडून तिकीट खरेदी नको
दिवाळी आणि छट पूजेच्या निमित्ताने ई-तिकिटांद्वारे प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जातात. त्यामुळे प्रवाशांनी दलालांकडून तिकिटे खरेदी बेकायशीर आहे. त्यामुळे अशी तिकिटे खरेदी न करण्याचे आणि एजंटांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.