पुणे – भाडेकरारावर घर घेतले असतानाही केवळ सदनिका बळकाविण्याच्या इराद्याने सासूच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. सासूचे घर खाली करण्याचा आदेश न्यायालयाने सुनेला दिला आहे. कॅंटोन्मेंट न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडारे यांनी हा निकाल दिला.
आदेशापासून एक महिन्याच्या आत फ्लॅट खाली करावा, सासूवर कोणत्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार करू नये तसेच फ्लॅटवर ताबा सांगू नये, असे निकालात नमूद केले आहे. या प्रकरणातील सून शबाना ही आयटीत नोकरीला आहे. तर त्यांचा पती समीर (नावे बदलली आहेत) देखील नोकरदार आहे. या जोडप्यात वाद सुरू असल्याने पत्नी भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत आहे. मात्र तिने आपल्याला राहायला घर नाही, असे दाखविण्यासाठी सासूच्या नावावर असलेल्या घराचा ताबा घेतला होता. सासू गृहिणी असून, सासरे निवृत्त झाले आहेत.
या प्रकरणात सासूने सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. सासू-सासऱ्यांना सून घरात घेत नसल्याने सासूने ऍड. भरत मोरे यांच्यामार्फत घराचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. समीरने शबाना यांना दरमहा 40 हजार रुपये पोटगी द्यावी, असा अंतरिम आदेश देखील या प्रकरणात न्यायालयाने दिला आहे. सून राहत असलेला फ्लॅट त्यांना “गिफ्ट डिड’च्या माध्यमातून मिळाला आहे. मात्र त्या घरात सून राहू देत नसल्याने आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे घराचा ताबा मिळावा, असे त्यांनी दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे. शबाना यांनी भाडेतत्त्वावर दुसरे घर घेतले आहे. वृद्ध सासू-सासऱ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद ऍड. मोरे यांनी केला.