सांगली – राज्यात अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जिवलग हिरावले. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातील आणखी एका कुटूंबावर कोरोनाने घाला घातला आहे. अवघ्या 20 दिवसांत मोहिते कुटुंब उद्धवस्थ झाले आहे. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील हे कुटुंब असून या कुटूंबातील चौघांचा एकापाठोपाठ एक असा 20 दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आधी आई-वडील आणि त्यापाठोपाठ दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. नुकतेच शिराळा येथील शिरशी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका कुटुंबातील चार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबातील अनिल सुखदेव मोहिते यांच्या आई वैजंयंता सुखदेव मोहिते (75) यांचा कोरोना अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 30 एप्रिल रोजी त्यांना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता अनिल यांचे वडील सुखदेव पांडुरंग मोहिते (80) यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल आणि अशोक या दोन भावांनी वयोवृद्ध असलेल्या वडिलांना उपचारासाठी बेड मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र बेड न मिळाल्यानं त्यांचा 6 मे रोजी घरातच मृत्यू झाला. आई पाठोपाठ वडील सोडून गेल्याचा अनिल आणि अशोक या दोन भावांसठी मोठा धक्का होता. त्यांनतर दोन्ही भावांची चाचणीही पॉझिटिव्ह अली.
आई आणि वडिल गेल्याच्या दुःखातून सावरत नाही तोवर या दोन भावांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपूर्ण कुटुंबच हादरले. अनिल यांचा मोठा भाऊ अशोक सुखदेव मोहिते (58) यांना कडेगाव मधील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असतानाच 15 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे अनिल सुखदेव मोहिते (47) यांनाही विटा येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. पण दुर्दैव की उपचारादरम्यान अनिल यांचाही मृत्यू झाला. आई-वडील आणि त्यांच्या पाठोपाठ दोन्ही भावांचाही कोरोनाने अवघ्या 20 दिवसांत मृत्यू झाला. आता या मोहिते कुटुंबात अनिल आणि अशोक मोहिते यांच्या पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.